🟦 महागाव | प्रतिनिधी श्री सुरज सुधाकरराव पवार
महागाव येथील एचपी गॅस एजन्सीच्या कथित मनमानी कारभारामुळे तालुक्यातील ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष विवेक राजेंद्र नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीकडून अनेक ग्राहकांना नियमित घरपोच गॅस वितरण सेवा मिळत नसून, केवळ काही ठराविक भागातच सिलिंडर पोहोचवले जात आहेत. तसेच ग्राहकांनी गोदामावर जाऊन सिलिंडर घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही नकार दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. "ओटीपी लवकर एक्सपायर होतो" असे कारण सांगून ग्राहकांची बोळवण केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यासही टाळाटाळ होत असल्याचा आरोप आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना बसत असून, स्वतःचे वाहन नसलेल्या ग्राहकांना गॅस मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. पैसे भरूनही वेळेवर सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रकरणी विवेक राजेंद्र नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून एजन्सीच्या कारभाराची सखोल चौकशी करून ग्राहकांना सुरळीत घरपोच सेवा उपलब्ध करून द्यावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीवर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढे काय कारवाई करते, याकडे महागाव तालुक्यातील ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment