Top News

आषाढी यात्रेसाठी उधना–मिरज विशेष रेल्वेला मंजुरी; खासदार स्मिताताई वाघ यांच्या पाठपुराव्याला यश


प्रतिनिधी | जळगाव
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने गाडी क्रमांक 09071/09072 उधना–मिरज–उधना विशेष रेल्वे चालविण्यास मंजुरी दिली आहे. ही विशेष रेल्वे 23 व 24 जुलै रोजी धावणार असून उत्तर महाराष्ट्रातील वारकरी व प्रवाशांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी ठरली आहे.

या विशेष रेल्वेचे अमळनेर स्थानकावर सकाळी 11.30 वाजता, तर धरणगाव स्थानकावर दुपारी 12.00 वाजता आगमन व प्रस्थान होणार आहे. त्यानंतर ही रेल्वे पंढरपूर येथे पहाटे 4.00 वाजता पोहोचणार असल्याने जळगाव जिल्ह्यासह परिसरातील वारकऱ्यांना आषाढी यात्रेसाठी सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.

ही विशेष रेल्वे सुरू करण्यासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने ही विशेष रेल्वे मंजूर झाली असून वारकरी, भाविक आणि सर्वसामान्य प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेऊन अधिकाधिक भाविकांनी सुरक्षित व सुलभ प्रवास करावा, असे आवाहन ZRUCC सदस्य प्रतीक जैन तसेच खानदेश प्रवासी असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post