Top News

नशिराबादमध्ये समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; साडेतीन हजारांहून अधिक लाभार्थ्यांना थेट लाभ.

▪️ एका शिबीरात एवढा विक्रमी लाभ देणारे जिल्ह्यातील पहिले महाराजस्व शिबीर

जळगाव, प्रतिनीधी दि. १२ जून - जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर २०२५ अंतर्गत नशिराबाद (ता. जळगाव) येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित भव्य शिबिरास ग्रामस्थ व लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ३५६१ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा व योजनांचा थेट लाभ प्रदान करण्यात आला.
   सकाळपासूनच लाभार्थ्यांची गर्दी शिबिरस्थळी उसळली होती. एकाच छताखाली विविध सेवा मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. महसूल, कृषी, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, महावितरण, तहसील, दुय्यम निबंधक, पुरवठा, नगरपरिषद आदी २७ विभागांचे ३० स्टॉल्स शिबिरात उभारण्यात आले होते. सातबारा उतारे, जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्रे, नॉन क्रीमीलेयर, आधार सिडिंग, रेशन कार्ड सुधारणा, प्रधानमंत्री आवास योजनेची नोंदणी अशा अनेक सेवा या ठिकाणी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत, नगरपरिषद मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक मनोरे, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रताप पाटील म्हणाले की,

“समाधान शिबिर म्हणजे जनतेच्या चेहऱ्यावर समाधान फुलवणारा उपक्रम. नशिराबादमध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठं समाधान शिबिर झालं असून, हजारो लोकांना थेट लाभ देण्यात आला. प्रशासन म्हणजे सेवा, तर बचत गट म्हणजे सहकार्य – ही एकत्रित ताकदच जनतेच्या जीवनातील समाधानाचा महामार्ग आहे.”
   यावेळी त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून नशिराबाद परिसरात मंजूर झालेल्या ‘बहिणाई मार्ट’ या खास महिला बचत गटाच्या मार्केटसाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली असून, लवकरच त्याचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले.

महिला बचत गटांना दिलेला मोठा आर्थिक हातभार.
या शिबिरात ७ ग्राम संघांना एकूण २४ लाख रुपयांचे धनादेश, ९ स्वयंसहायता समूहांना थेट ५० लाखांचा निधी, तसेच महिला बचत गटांना एकूण १ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. या वाटपामुळे अनेक बचत गटांना व्यवसायवृद्धीसाठी चालना मिळणार आहे.

याच शिबिरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, गरजू ५१ अनुसूचित जमातीतील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दप्तर, छत्र्या व इतर आवश्यक साहित्य लाभार्थ्यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले.

प्रास्ताविक करताना प्रांताधिकारी श्री. विनय गोसावी यांनी समाधान शिबीराचे महत्व सांगून नशिराबाद येथील शिबीराचे वैशिष्ट्य सांगतांना ते म्हणाले, 

“समाधान शिबिर ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दूरदृष्टीची संकल्पना असून, त्यांच्यामुळेच प्रशासन गावागावात जाऊन लोकांना थेट सेवा देत आहे. जनतेच्या दारात सेवा पोहोचवण्याचे कार्य यामधून घडत आहे.”

यावेळी विशेष रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 
   या कार्यक्रमाला तहसीलदार शितल राजपूत, मुख्याधिकारी सोनवणे, पोलीस निरीक्षक मनोरे, राहुल वाघ, डी.बी. जाधव, नवीन भावसार, मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, तलाठी रुपेश ठाकूर, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, जि.प. माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, कीर्तीकांत चौबे, विकास धनगर, पिंटू शेठ पाटील, प्रभाग संघ अध्यक्षा प्रमिला सपकाळे, सचिव कविता लोहार, तसेच हजारोंच्या संख्येने महिला बचत गटाच्या सदस्य व लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील व मोनिका लंगरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन नायब तहसीलदार राहुल वाघ यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post