पाळधी येथून जवळ असलेल्या शेरी गावात सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा सुवर्णाबाई कैलास पाटील यांची निवड झाली आहे. याआधी 2019 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर त्या सरपंच झाल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आल्याने त्यांना पद सोडावे लागले होते.
अविश्वासानंतर सरपंच पदाची जबाबदारी विमलबाई देविदास चौधरी यांनी सांभाळली. मात्र, त्यांनी ओबीसी जातीचे वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्या अवघ्या १६ महिन्यांत अपात्र ठरल्या. त्यामुळे पुन्हा सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत सुवर्णाबाई कैलास पाटील व अश्विनी नितेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, अश्विनी पाटील यांचे ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. सुवर्णाबाई पाटील यांनी पूर्ण कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक अधिकारी हेमंतकुमार महाजन यांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली.
निवड सभेला नऊ सदस्यांपैकी आठ उपस्थित होते. त्यात सुवर्णाबाई पाटील व माजी सरपंच विमलबाई चौधरी यांच्या प्रत्येकी एक मते पडली, तर उर्वरित सहा सदस्य तटस्थ राहिले.
सुवर्णाबाई पाटील यांच्या निवडीनंतर त्यांच्या पती कैलास पाटील यांनी, “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. गावात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.
Post a Comment