Top News

हनुमान जयंतीनिमित्त पाळधी येथे गदा पूजन सोहळा संपन्न.


तालुका धरणगाव,जिल्हा जळगाव | ११ एप्रिल २०२५

पाळधी (ता. धरणगाव) येथील श्रीराम मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने भव्य गदा पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा धार्मिक सोहळा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पार पडला. कार्यक्रमात परिसरातील विविध धार्मिक व सामाजिक स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.

या वेळी श्री विनोद शिंदे यांनी गदा पूजनाचे धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, "गदा ही केवळ युद्धातील शस्त्र नसून ती भक्ती, शौर्य आणि संयमाचे प्रतीक आहे. मारुतीरायांनी ही गदा वापरून अन्यायाविरुद्ध लढा दिला, म्हणून आजच्या काळात गदा पूजन करून आपण धर्मरक्षणाचा संकल्प करतो."

गदा पूजनानंतर सामूहिक मारुती स्तोत्राचे पठण करण्यात आले. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे पठणात सहभाग घेतला. या प्रसंगी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथही उपस्थित धर्मप्रेमी बांधवांनी घेतली.

कार्यक्रमास श्री किरण माळी, श्री शुभम माळी, तसेच पाळधी गावातील अनेक धर्मप्रेमी नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाने गावात धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाल्याने हा सोहळा गावकऱ्यांच्या मनात दीर्घकाळ राहील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

पाळधी परिसरातील एकूण २३ ठिकाणी गदा पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे अधिकाधिक धर्मप्रेमी बांधवांनी या पवित्र उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post