Top News

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

पाळधी (ता. धरणगाव) : इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे शनिवार, दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील विविध स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा व गुणवंतांचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

वर्षभरात इंग्लिश ओलंपियाड, सायन्स ओलंपियाड, मॅथ ओलंपियाड, MTS परीक्षा, तसेच हिंदी राजभाषा स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये शाळेच्या 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, यापैकी तब्बल 450 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकावले. MTS राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत धरणगाव तालुक्यातील पहिल्या सहा यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व देखील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलनेच केले, ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली.
कार्यक्रमात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला शाळेचे अध्यक्ष इंजि. नरेश चौधरी, शिक्षण अधिकारी श्री. विजय पवार (जळगाव), उद्योजक श्री. योगेश कलंत्री, समाजसेवक श्री. शरदभाऊ नागपूरे आणि श्री. श्रीकांत वाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

SOF Olympiad मार्फत शाळेतील मेहनती शिक्षकांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील स्पर्धा परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष नरेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत, करिअर व स्पर्धा परीक्षांमधील संधींबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना प्राचार्य श्री. विवेक रुपनर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, पालकांचे व शिक्षकांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post