Top News

जनसेवा हीच ईश्वर सेवा — शरद खाडीलकर यांचे विवेकानंद व्याख्यानमालेत प्रतिपादन


"देशभक्ती व सेवा कार्याची परंपरा संघ संस्कारातूनच मिळते. ही सेवा केवळ प्रसिद्धीसाठी नसून ती समाज उन्नतीसाठी आणि दिनदुबळ्यांच्या उद्धारासाठी असते," असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे प्रचारक शरद खाडीलकर (मुंबई) यांनी केले. श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ व विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात ते बोलत होते.
‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या विषयावर बोलताना खाडीलकर यांनी विविध ऐतिहासिक आणि आध्यात्मिक उदाहरणांचा संदर्भ देत सेवा कार्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी संत गाडगेबाबा, विनोबाभावे, रामकृष्ण परमहंस यांसारख्या विभूतींनी समाजातील पीडित, शोषित, दुर्बल घटकांसाठी केलेल्या सेवाकार्याचा उल्लेख करत सांगितले की, "सेवेमध्येच परमेश्वराचे दर्शन होते."

ठोंबरे विद्यालयाच्या पटांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात शरद खाडीलकर यांनी दीड तासांच्या प्रबोधनातून संघ स्वयंसेवकांपासून ते विविध संतांच्या सेवाकार्याचा इतिहास उलगडून दाखवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रमेश महाजन (अध्यक्ष, विक्रम ग्रंथालय) होते. संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया, सचिव ललित उपासनी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष चिंतामण पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय परमेश्वर रोकडे यांनी केला. सूत्रसंचालन महेश आहेराव यांनी तर आभार प्रदर्शन आर. डी. महाजन यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post