जळगांव : महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना एक अनोखी मागणी करणारे पत्र पाठवले आहे. त्यांनी महिलांच्या वतीने "एक खून माफ करण्याची" मागणी केली आहे.
"महिला सुरक्षित नाहीत – आम्हाला लढावेच लागेल!"
या पत्रात त्यांनी देशातील महिला सुरक्षेच्या बिकट परिस्थितीवर प्रकाश टाकत म्हटले आहे की, भारत महात्मा गांधी व महात्मा बुद्ध यांचा अहिंसेचा देश आहे, परंतु आज महिलांवरील वाढते अत्याचार आणि कायद्याची निष्क्रियता पाहता महिलांना आता स्वतःच लढावे लागेल.
मुंबईतील १२ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा उल्लेख करत त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेवरील प्रश्न ऐरणीवर आणला आहे. तसेच, नुकत्याच प्रकाशित झालेल्या "वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू" सर्वेक्षणाचा दाखला देत त्यांनी भारत हा आशियातील सर्वात असुरक्षित देश ठरल्याची बाब निदर्शनास आणली आहे.
"अत्याचारी प्रवृत्तीचा खून माफ करा!"
या पत्रात त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, "आम्हाला खून करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा आणि निष्क्रिय कायदा-सुव्यवस्थेचा!" यासाठी राष्ट्रपतींनी या "एक खुनाची" माफी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
इतिहासातील महाराणी ताराराणी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दाखला देत महिलांना सामाजिक न्यायासाठी शस्त्र उचलण्याची वेळ आल्याचे त्यांनी सुचवले आहे.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आता गाजण्याची शक्यता आहे. सरकार आणि प्रशासन या पत्राकडे कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment