जळगाव लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई – पारोळ्यातील घटना
पारोळा (जळगाव) – शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने सापळा रचत कारवाई केली. पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील तलाठी महेशकुमार भाईदास सोनावणे (वय ५०) यांना ६,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार आणि त्यांचे भाऊ यांचे शेवगे बुद्रुक येथे N.A. (नॉन-अॅग्रीकल्चर) झालेले ९ प्लॉट्स आहेत. त्या प्लॉट्सवर अधिकृत नोंदी लावून देण्यासाठी तलाठी महेशकुमार सोनावणे यांनी एकूण १०,१७० रुपयांची लाचेची मागणी केली. प्रत्येक नोंदीसाठी १,१३० रुपयांप्रमाणे हा मोबदला ठरवण्यात आला. तडजोडीनंतर ही रक्कम ६,००० रुपयांवर आली.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे ACBच्या पथकाने पडताळणी करून सत्यता तपासली आणि त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सापळा रचून तलाठ्यास ६,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.
ACBची नागरिकांना सूचना
शासकीय काम करून देण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर तात्काळ तक्रार दाखल करावी.
▶️ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव संपर्क क्रमांक – 02572235477
▶️ टोल फ्री क्रमांक – 1064
मार्गदर्शन:
- मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर – पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र
- श्री योगेश ठाकूर – पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, जळगाव
सापळा पथक:
- श्रीमती स्मिता नवघरे – पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, जळगाव
- पो.हे.कॉ. किशोर महाजन, पोकॉ. राकेश दुसाणे, पोकॉ. पोळ
Post a Comment