Top News

पाळधी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानास अर्पण केलेले प्रेरणादायी व्याख्यान यशस्वीपणे संपन्न.



पाळधी: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आणि संस्थापक पू. भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने पाळधी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यान मोठ्या उत्साहात आणि शौर्यपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडले.

फाल्गुन शु. १ ते फाल्गुन अमावस्यापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी नरक यातना सहन करताना देखील धर्माचा त्याग केला नाही. त्यांच्या या अद्वितीय धैर्य आणि बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित धर्मवीर बलिदान मास या व्याख्यानात वर्धा येथील शिवचरित्र व्याख्याते आणि धारकरी श्री अक्षयजी चंदेल यांनी शौर्य जागवणारे आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

श्री चंदेल यांनी संभाजी महाराजांच्या पराक्रमाची, त्यागाची आणि त्यांच्या अपूर्व सहनशक्तीची गाथा उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडली. त्यांनी सांगितले की, "छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे फक्त इतिहासातील एक घटना नाही, तर हिंदवी स्वराज्याच्या अस्तित्वासाठी दिलेले प्रेरणादायी बळ आहे. त्यांच्या त्यागातून हिंदूंना धर्म व स्वाभिमान जपण्याची शिकवण मिळते."

कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या बलिदानास अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठित व्यक्ती प्रतापराव गुलाबराव पाटील, दिलीप बापू पाटील, विजू बापू पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश दादा फडे यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व समस्त गावकऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

दिनांक 27/02/2025, वार गुरुवार रोजी संध्याकाळी 7:00 वाजता, मुख्य आठवडे बाजार मैदान, भगवा चौक, पाळधी येथे पार पडलेल्या या व्याख्यानाला तालुक्यातील शिवप्रेमी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भव्य प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि भविष्यातही अशा शौर्यदायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

जय भवानी! जय शिवाजी!
धर्मवीर संभाजी महाराज की जय!


Post a Comment

Previous Post Next Post