प्रतिनिधी | अमरावती
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन अथवा कोणत्याही कृषी विद्यापीठामध्ये 'कृषीमित्र' नावाचे कोणतेही अधिकृत पद अस्तित्वात नसून, सध्या सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांवर सुरू असलेली 'कृषीमित्र' पदभरतीची जाहिरात पूर्णपणे बोगस असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना अशा खोट्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. हजारो जागा, आकर्षक वेतन आणि प्रशिक्षणाचे आमिष दाखवून काही संस्था उमेदवारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे.
या प्रकाराची कृषी विभागाने गंभीर दखल घेतली असून, बोगस भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या संस्था आणि संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कृषी विभागाने नागरिकांना कोणत्याही प्रकारची पैशांची देवाणघेवाण न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा बोगस भरतीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment