प्रतिनिधी : श्री सुरज पवार
स्थानिक वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडगाव रोड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राष्ट्रीय हरित सेनेची स्थापना करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कार्यभार सोपविण्यात आला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक तसेच श्री नाईक शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक, शिक्षणमहर्षी माजी आमदार प्रतापसिंगजी आडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
गेल्या वर्षी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जिन्नेवार यांनी विद्यार्थ्यांना विविध वृक्षांचे बीज संकलन करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांपासून शाळेतच विविध प्रकारची रोपे तयार केली. याच रोपांची लागवड शालेय परिसरात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पूर्वी तयार केलेली आंब्याची झाडे आजही शाळेच्या परिसरात बहरलेली असून पर्यावरणप्रेमाची साक्ष देत आहेत.
राष्ट्रीय हरित सेनेचे सचिव राजू ढवक यांनी चालू शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये वृक्ष राखी पौर्णिमा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती, पर्यावरणपूरक होळी तसेच शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आदी उपक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक प्रशांत जिन्नेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, "खरा राष्ट्रीय हरित सेनेचा सेनापती तोच, जो केवळ वृक्षलागवड न करता त्या वृक्षांचे संगोपन करून त्यांना जगविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो," असे सांगितले. लावलेले प्रत्येक झाड जिवंत राहील यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रशांत जिन्नेवार हे स्वतः विविध प्रकारच्या बियांचे संकलन करून त्यापासून तयार केलेली रोपे मित्रपरिवार, शेतकरी, शाळा व नागरिकांना विनामूल्य वितरित करत असून त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरात हजारो वृक्ष वाढले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कुयटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोहिनी राठोड, भाग्यश्री भोसले आणि गट्टू जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment