पुसद | प्रतिनिधी श्री सुरज पवार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 'माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, पुसद'च्या वतीने 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमाचा शनिवारी (५ जुलै) उत्साहात शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढते तापमान, वृक्षतोड आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल लक्षात घेता केवळ वृक्षारोपण न करता झाडे जगविण्यावर भर देणे ही काळाची गरज आहे. यापुढे 'माणुसकीची भिंत मदत केंद्र' येथे अन्नदानाची तारीख उपलब्ध नसल्यास अन्नदात्यांना त्यांच्या आईच्या नावाने झाड लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
या उपक्रमातील पहिले वृक्षारोपण 'माणुसकीची भिंत'चे अध्यक्ष गजानन दत्तात्रय जाधव यांच्या मातोश्री सौ. शांताबाई दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्ध सप्तखंजिरी वादक पंकजपाल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जाधव बाग, पार्डी रोड, लिंबी येथील कर्मयोगी संत गाडगे बाबा स्मृतीस्थळी वडाचे रोप लावून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला 'माणुसकीची भिंत', मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था यांचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, जाधव परिवारातील सदस्य तसेच लिंबी-पार्डी परिसरातील वृक्षप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत या उपक्रमाचे स्वागत केले.
Post a Comment