नांदेड | प्रतिनिधी
महानायक वसंतरावजी नाईक यांच्या पर्यावरणपूरक आणि ग्रामविकासाच्या विचारांना समर्पित असलेल्या 'वसंत वन अभियानाला' यंदा 18 वर्षे पूर्ण होत असून, त्यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त रविवार, 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता स्व. पुरणमल लाहोटी सभागृह, सायन्स कॉलेज, नांदेड येथे 113 तांडा नायकांचा सन्मान व सन्मान गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
2008 साली सुरू झालेल्या या अभियानाची सुरुवात भोकर विभागातील पळसगाव तांडा व फुलसिंग नाईक तांडा येथे तत्कालीन उपविभागीय अधिकारी (एसडीएम) मा. खंदारे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाने झाली होती. तांड्यातील नायक, कारभारी आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून सुरू झालेला हा उपक्रम आज राज्यभर प्रेरणादायी अभियान म्हणून ओळखला जात आहे.
गेल्या 18 वर्षांपासून दरवर्षी 1 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत 'वसंत वन अभियान' राबविण्यात येत असून, वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धन, ग्रामविकास आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश गावागावांत व तांडा वस्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
यंदाच्या वर्षी "हरित तांडा, हरित गाव" हा संकल्प घेऊन विविध तांडा वस्त्यांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच समाजाला एकत्र ठेवणाऱ्या आणि तांड्याचे नेतृत्व करणाऱ्या 113 तांडा नायकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यासोबतच पर्यावरण संरक्षण, मानवता आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांनाही सन्मान गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, तांडा प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नवज्योत मानव विकास मंडळ व सेवा दळ सेवा संघटना, भारत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी श्री सुरज सुधाकरराव पवार
सनातन सारथी न्यूज
Post a Comment