Top News

अधिक मासानिमित्त धरणगावात भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचा मंगलारंभ; भक्ती, ज्ञान व नामस्मरणाचा महासोहळा

धरणगाव प्रतिनिधी :
पुरुषोत्तम अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त धरणगाव नगरीत सोमवार, दि. ८ जून २०२६ पासून श्री बालाजी मंदिराच्या नवीन हॉलमध्ये भव्य श्रीमद् भागवत कथा व दिव्य ज्ञानयज्ञ सोहळ्याचा मंगलारंभ होत आहे. भगवान श्री बालाजी महाराज व सावळ्या विठुरायाच्या कृपाशिर्वादाने आयोजित या आध्यात्मिक महोत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि हरिनामाच्या अखंड गजराने दुमदुमून जाणार आहे.

माउली वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य ह.भ.प. महामंडलेश्वर १००८ श्री भगवानदासजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने आयोजित या ज्ञानयज्ञात महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवताचार्य ह.भ.प. अतुल महाराज नारणेकर आपल्या अमृतमय वाणीतून श्रीमद् भागवत महापुराणातील अध्यात्म, भक्ती, संस्कार, धर्माचरण आणि जीवनमूल्यांचे रसाळ व हृदयस्पर्शी निरूपण करणार आहेत.

दि. ८ जून ते १५ जून या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री ८.०० ते १०.३० या वेळेत श्रीमद् भागवत कथेचे प्रासादिक निरूपण होणार आहे. या संपूर्ण सप्ताहात भाविकांना भागवत ज्ञानगंगेचे अमृतमय श्रवण करण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.

सोमवार, दि. १५ जून रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. पारस महाराज जैन बनोटीकर यांचे भक्तिरसपूर्ण व पारंपरिक काल्याचे कीर्तन संपन्न होणार असून त्यानंतर कथा सांगता सोहळा व महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या भव्य आध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव यांच्या वतीने करण्यात आले असून श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ, श्री संतकृपा बहुउद्देशीय संस्था, समस्त ग्रामस्थ पंच मंडळ तसेच महिला व पुरुष भजनी मंडळ, धरणगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

अधिक मासातील हे पुण्यदायी, दुर्मिळ आणि आध्यात्मिक पर्व भक्ती, ज्ञान, नामस्मरण आणि संस्कारांचा अमूल्य संगम ठरणार आहे. त्यामुळे धरणगाव व परिसरातील सर्व भाविक, वारकरी संप्रदायातील भक्तगण, माता-भगिनी, युवक तसेच धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ, कथा श्रवण, कीर्तन सेवा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

"हरिनाम घ्या... भागवत ऐका... आणि जीवन धन्य करा!"

Post a Comment

Previous Post Next Post