यवतमाळ, प्रतिनिधी :
मानव सेवा हीच ईश्वर सेवा या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी कार्य करणारे मानव कुटी, ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) चे संचालक प्राचार्य डॉ. संजय सुशीला प्रभाकरराव हर्षे यांच्या जीवनकार्यावर आधारित 'प्राचार्य डॉ. संजय हर्षे यांचा प्रेरणादायी प्रवास' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन लवकरच होणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती लेखक पत्रकार सुरज सुधाकरराव पवार यांनी दिली.
डॉ. संजय हर्षे हे १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात हौतात्म्य पत्करलेले स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा गोपाळराव रामचंद्रराव हर्षे यांचे वंशज असून, त्यांनी समाजसेवा, शिक्षण आणि मानवकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे शब्दांकन सुप्रसिद्ध लेखक, कवी व पत्रकार सुरज सुधाकरराव पवार यांनी केले आहे.
पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असलेले सुरज सुधाकरराव पवार हे बंजारा ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाप्रमुख तसेच सनातन सारथी न्यूजचे प्रतिनिधी आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या 'वसंत गीतांजली' या कविता संग्रहाचेही त्यांनी संपादन केले आहे.
'प्राचार्य डॉ. संजय हर्षे यांचा प्रेरणादायी प्रवास' हा ग्रंथ वारकरी प्रकाशन, मुंबई यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार असून, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी हा ग्रंथ प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment