Top News

कलीयुगातून तरण्याकरिता भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन — ह.भ.प. रामेश्वर महाराज

पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास उत्साहात प्रारंभ पाळधी /धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी): राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पालधी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास काल अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. जीपीएस ग्रुप व युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या नेतृत्वात व नियोजनाखाली आयोजित या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर हरिनाममय झाला.
“कलीयुगातून तरून जाण्याकरिता भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे,” असे मार्मिक प्रतिपादन ह.भ.प. रामेश्वर महाराज पाळधीकर यांनी आपल्या रसाळ कीर्तनातून केले. नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, जीवनाला दिशा मिळते आणि भगवंताशी नाते दृढ होते, असे सांगताना त्यांनी संत साहित्य, अभंग आणि संतवचनांच्या माध्यमातून नामभक्तीचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे उलगडून सांगितले. त्यांच्या ओघवत्या वाणीला उपस्थित भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाळधी येथे उभारण्यात आलेला भव्य मंडप, आधुनिक साऊंड सिस्टिम, आकर्षक व भव्यदिव्य व्यासपीठ तसेच भाविकांसाठी करण्यात आलेल्या सर्व सुखसोयी हे या सप्ताहाचे विशेष आकर्षण ठरत आहे. एकावेळी पाच हजारांहून अधिक भाविक बसू शकतील अशी भव्य व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण परिसरात भक्ती, अध्यात्म आणि संतविचारांचा जागर अनुभवायला मिळत आहे. या भक्तिमय सोहळ्यास ह.भ.प. ईश्वरलाल महाराज पाळधीकर, ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प. गोपाल महाराज दोनगावकर, मृदंग सम्राट ह.भ.प. यज्ञेश महाराज आळंदीकर, गायनाचार्य ह.भ.प. मयूर महाराज तसेच ह.भ.प. परमेश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पालधी परिसरात सुरू झालेल्या या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहामुळे संपूर्ण पंचक्रोशीत भक्तिरसाची उधळण झाली असून, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post