जळगाव, प्रतिनिधी – भुसावळ येथून पाळधीला परत येत असताना जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात धक्कादायक घटना घडली. चालत्या कारमध्ये मागच्या सीटवर असलेल्या तरुणाच्या हातून बंदुकीतून गोळी सुटली आणि ती थेट समोर बसलेल्या मित्राच्या पाठीत घुसली. ही घटना बुधवारी, दि. 14 मे रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली असून, जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी गोळी सुटलेल्या मित्राला अटक केली आहे.
काय घडलं नेमकं?
नाजिम फिरोज पटेल (वय 23, रा. पाळधी, ता. धरणगाव) आणि त्याचा मित्र तोहीद कय्यूम देशपांडे (वय 23) हे दोघे भुसावळ येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते मध्यरात्री कारने पाळधीकडे परत येत होते. कार जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातून जात असताना अचानक मागे बसलेल्या तोहीदच्या हातातील बंदुकीतून गोळी सुटली आणि ती समोर बसलेल्या नाजिमच्या पाठीत घुसली.
गोंधळ आणि तातडीचा उपचार
घटनेनंतर कारमधील मित्र घाबरून गेले. त्यांनी नाजिमला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारांनंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
मित्र अटकेत
बंदुकीतून गोळी सुटल्याचा प्रकार गंभीर असल्याने जळगाव शहर पोलिसांनी तोहीद देशपांडे याला तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू असून, बंदूक कशी आणि कुठून आली, याचीही चौकशी सुरू आहे.
गावाकडे वाढतंय बेकायदेशीर शस्त्र साठा?
या घटनेमुळे पुन्हा एकदा गावाकडे वाढणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रसाठ्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सामान्य युवकांकडे बंदुकीसारखी घातक शस्त्रं कुठून येतात आणि ती कोणत्या हेतूने बाळगली जातात, याकडे प्रशासनाला गांभीर्याने पाहावे लागणार आहे.
Post a Comment