Top News

साळवे इंग्रजी विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.


साळवा (प्रतिनिधी):
धरणगाव तालुक्यातील साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. मोरे यांनी भूषवले.

कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. त्यांचे जीवन म्हणजे शिक्षणासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी चाललेली अखंड लढाई होती. त्यांनी दाखवलेला 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे आवश्यक आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे विचार प्रभावी भाषणांमधून सादर केले. भावेश अहिरे या विद्यार्थ्याने बाबासाहेबांवरील गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. काही विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन आर. पी. नेहेते मॅडम यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा संदेश अधोरेखित करत, "शिक्षण हेच खरे शस्त्र आहे," असे सांगितले.

या प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका गुणवंती पाटील, प्रतिभा पाटील, पौर्णिमा वारके, वर्षा नेहेते, जयश्री कोल्हे, कांचन अत्तरदे, तसेच शिक्षक ए. वाय. शिंगाणे, एस. व्ही. राठोड, एस. पी. तायडे, इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post