धरणगांव : परमपूज्य श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्त २० मार्च २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत जानकी नगर, जळगाव ते त्र्यंबकेश्वर गुरुकुलपीठपर्यंत पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
धरणगाव येथे पालखीचे उत्साहात स्वागत
२१ मार्च २०२५, शुक्रवार रोजी संध्याकाळी ५.०० वाजता धरणगाव उड्डाणपूल येथे पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सामुदायिक अखंड श्री स्वामी समर्थ नामजप करत गावातून पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल. मिरवणुकीचा मार्ग बस स्टँड, धनगर गल्ली, परिहार चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, श्री स्वामी समर्थ नगर असा राहणार आहे. अखेरीस श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे पालखी सोहळ्याचा समारोप होईल.
स्वामी भक्तांसाठी सुवर्णसंधी
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांचे जन्मजन्मांतरातील शाप, ताप, दुःख व समस्या दूर होतात, असा भक्तांचा श्रद्धेचा विश्वास आहे. तसेच, या पालखी सोहळ्याद्वारे खेड्यापाड्यात व शहरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे कार्य पोहोचवण्याचा उद्देश आहे. सेवा मार्गातील १८ विभागांचे मार्गदर्शनही या माध्यमातून होणार आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा – सेवा केंद्राचे आवाहन
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तालुका सेवेकरी परिवाराच्या वतीने या पालखी दिंडी सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी सहभागी झालेल्या अनेक भाविकांनी या सोहळ्यातील आध्यात्मिक अनुभव व्यक्त केले आहेत. त्यामुळे, या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घ्यावा, असे आयोजकांचे आवाहन आहे.
Post a Comment