धरणगाव, प्रतिनिधी – ग्राम सुधारणा मंडळ व साळवे इंग्रजी विद्यालय, साळवे यांच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. मयूर जैन यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत समाजाला व्यसनमुक्त राहण्याचा संदेश दिला.
डॉ. जैन म्हणाले, "विद्यार्थ्यांचे आरोग्य, मन आणि मेंदू तल्लख असेल तर त्याची प्रगती आपोआपच होते. अभ्यासासोबत व्यायामावर भर दिल्यास विद्यार्थी स्वतःच्या, गावाच्या आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकतात."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. शशिकांत नारखेडे होते. तसेच, चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे, सचिव रमेश बोरोले, खजिनदार डॉ. चंद्रकांत नारखेडे, सदस्य लीलाधर बऱ्हाटे आणि प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे डॉ. भोळे उपस्थित होते.
संस्थेचा ऐतिहासिक वारसा
प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक एस. डी. मोरे यांनी संस्थेच्या स्थापनेचा ऐतिहासिक वारसा उलगडला. त्यांनी सांगितले की, 12 मार्च 1951 रोजी दांडी यात्रेच्या स्मरणार्थ सामाजिक आणि शिक्षणप्रेमी डॉ. कै. देवरामभाऊ नारखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेची स्थापना केली. सात दशकांनंतरही हा वटवृक्ष बहरलेला असून, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
पंचक्रोशीतील खर्दे, कामतवाडी, भामर्डी, उखळवाडी, नारणे, निशाने, साखरे रोडवर, निमझरी आणि कंडारी येथील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या ग्राम सुधारणा मंडळामार्फत साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, किमान कौशल्य विभाग आणि पप्पू साने गुरुजी सेमी प्राथमिक विद्यालय यशस्वीरीत्या चालवले जात आहे.
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश
ज्येष्ठ शिक्षिका नीता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "अभ्यासासोबतच विविध कौशल्ये आत्मसात करून, आपली आणि गावाची प्रगती साधावी," असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक व्ही. के. मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
Post a Comment