Top News

इतिहास, प्रेरणा आणि स्वप्नपूर्तीचा काव्यमय दस्तऐवज — ‘वसंत गीतांजली’

पुस्तक समीक्षा

कविता ही केवळ शब्दांची सजावट नसून ती मानवी मनातील संवेदना, विचार आणि अनुभवांचा सजीव प्रवाह असते. समाजातील वास्तव, इतिहासातील प्रेरणा, व्यक्तींचे संघर्ष आणि भविष्याची स्वप्ने जेव्हा शब्दरूप घेतात, तेव्हा कविता जन्म घेते. आणि मग ती केवळ भावनांचा आविष्कार नसून काळाचा दस्तऐवज बनते, मूल्यांची पेरणी करते आणि विचारांना दिशा देते. अशाच व्यापक साहित्यप्रवाहाचा एक अर्थपूर्ण संगम म्हणजे ‘वसंत गीतांजली’.

‘वसंत गीतांजली’ हा काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातील एका महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली काव्यात्मक श्रद्धांजली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे , शेतकऱ्याचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा ध्यास हे ध्येय हृदयासी बाळगणारे ,लोकनेते वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित हा संग्रह प्रेरणा, इतिहास आणि मानवी मूल्यांचा सखोल आविष्कार घडवतो.

या संदर्भात बंजारा समाजाचे आद्य दैवत संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा, प्रभावही महत्त्वाचा ठरतो.
"सत्य मार्गाने चला". "साधेपणात जग जिंका" "मानवतेची सेवा करा"
त्यांच्या उपदेशपर परंपरेतून घडलेली मूल्यव्यवस्था, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची भावना हीच पुढे वसंतराव नाईक यांच्या सारख्या महान नेतृत्वात प्रतिबिंबित होताना दिसते. त्यांचे ग्राम विकासाचे कार्य हे त्या मूल्य परंपरेची आधुनिक रूप मानता येते.त्यामुळे हा काव्यसंग्रह केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून एका व्यापक सामाजिक-आध्यात्मिक परंपरेचाही सन्मान ठरतो.


शीर्षकातील अर्थ आणि प्रतीकात्मकता

‘वसंत’ म्हणजे नवचैतन्य, नवसृजन आणि परिवर्तनाचे प्रतीक; तर ‘गीतांजली’ म्हणजे भावनांचे समर्पण. या दोन संकल्पनांचा संगम म्हणजे ‘वसंत गीतांजली’.

या शीर्षकातून कवीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो—वसंतराव नाईक यांना केवळ राजकीय नेता म्हणून नव्हे, तर समाजपरिवर्तन घडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शिल्पकाराच्या रूपात पाहणे. त्यांच्या कार्यातून ग्रामीण महाराष्ट्रात आलेले नवचैतन्य म्हणजेच ‘वसंत’ आणि त्या कार्याला दिलेले काव्यमय समर्पण म्हणजे ‘गीतांजली’.
म्हणूनच या काव्यसंग्रहाला दिलेले' वसंत गीतांजली 'हे नाव 
आणि संग्रहाला दिलेले मुखपृष्ठ हे वाचकाचे लक्ष वेधून घेते.


लेखक आणि स्वप्नांची कहाणी

या काव्यसंग्रहाचे मूळ लेखक स्वर्गीय सुधाकर पवार हे संवेदनशील कवी आणि सामाजिक जाणिवा असलेले साहित्यप्रेमी व्यक्तिमत्त्व होते. वसंतराव नाईक यांच्या सोबत समाज सेवा करण्याचे त्यांना अहोभाग्य लाभले होते. त्यामुळेच त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, कृतज्ञता आणि सामाजिक जाणिवा या कवितांमधून स्पष्टपणे व्यक्त होतात.

परंतु त्यांच्या हयातीत हा संग्रह प्रकाशित होऊ शकला नाही. त्यामुळे या ग्रंथाला अपूर्ण स्वप्नांचा भावनिक संदर्भ लाभतो.

हे अपूर्ण स्वप्न पुढे पूर्ण केले त्यांच्ये सुपुत्र पत्रकार ,कवी, लेखक सुरज पवार यांनी. वडिलांच्या हस्तलिखिताला प्रकाशित स्वरूप देताना त्यांनी केवळ पुस्तक प्रकाशित केले नाही, तर एका पित्याच्या साहित्यिक वारशाचे जतन केले. त्यामुळे हा संग्रह एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेल्या भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक ठरतो.


संग्रहाची रचना आणि आशय

या संग्रहात एकूण अकरा कविता आहेत. या कविता वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याचे विविध पैलू उलगडतात—लोकाभिमुख नेतृत्व, ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण, सामाजिक न्याय आणि व्यापक राष्ट्रनिर्मितीचा दृष्टिकोन.

याशिवाय कवी.बा.पू.राठोड (शांतीकुमार ), अजय चव्हाण (शब्दसखा) रावजी राठोड (तांडेलकार ) या कवींच्याही रचनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा संग्रह केवळ एका व्यक्तीच्या अभिव्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर सामूहिक आदरभावनेचा साहित्यिक दस्तऐवज बनतो.


कवितांचा आशयात्मक आढावा

वसंतरावजी | नाईक महान. |
जणू भाग्यवान |आम्हासाठी. |


भुकेल्याजीवाला| पुरविले धान्य| 
कार्य असामान्य | नाईकांचे. ||

‘नाईक साहेब’

या अभंगातून वसंतराव नाईक यांचे लोकाभिमुख नेतृत्व, साधेपणा आणि जनतेशी असलेली नाळ प्रभावीपणे उभी केली आहे. सत्ता म्हणजे अधिकार नव्हे तर सेवा आहे, ही भावना यात ठळकपणे जाणवते.


वसंता तू महाराष्ट्राचा गोर नायक 
गोर गणाचा तू थोर नायक 
तुझे स्वप्न फुल्याच्या हरितात
हिरव्या बोलीचा तुला प्रणिपात 

वसंत वारा या कवितेतून

निसर्ग आणि नेतृत्व यांचा प्रतीकात्मक संगम या कवितेत दिसतो. वसंत ऋतू जसा नवचैतन्य निर्माण करतो, तसेच नाईक साहेबांच्या कार्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात विकासाची नवी ऊर्जा निर्माण झाली, हा विचार यात व्यक्त होतो.


शेतकऱ्यांच्या बांधावरून 
अभिवचन राष्ट्राला 
कटीबद्ध स्वयंपूर्णतेला अथवा 
द्या फाशी मजला

‘अभिवचन राष्ट्राला’

ही कविता राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देते. प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रनिर्मितीत योगदान आवश्यक आहे, हा प्रेरणादायी संदेश यात आहे.


"दिग्रस भूमीची इतिहास गाथा 
जमला बंजाराचा जत्था 
अर्ध शतकापूर्वी जाहले 
प्रथम बंजारा महासंमेलन
वसंतरावजी नाईक यांनी फडकविले बंजारा निशान"

‘इतिहास गाथा’ या कवितेतून

इतिहास हा केवळ भूतकाळ नसून वर्तमानाला दिशा देणारा आणि भविष्य घडवणारा प्रेरणास्रोत आहे, ही ठोस भूमिका या कवितेत मांडली आहे.


इतर कवितांचा आशय
संग्रहातील इतर कवितांमधूनही
जशी वसंत सौरभ ,निधी ध्यास, जय बंजारा ,मसीहा ,हाजुसंग जय बंजारा हिंदी ,हिरवी रंगावली या सर्व कविता मधून
ग्रामीण विकासाची तळमळ
शेतकऱ्यांविषयीची बांधिलकी
सामाजिक न्यायाची भावना
आणि लोककल्याणाचा व्यापक दृष्टिकोन, आणि वसंतराव नाईक यांचे महात्म , त्यांच्या विषय असलेला आदरभाव, त्यांची गौरव गाथा हे सर्व पैलू ठळकपणे दिसतात.

भाषाशैली

या काव्य संग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे साधी, सरळ सोपी आणि प्रभावी भाषा. अलंकारिकतेचा अतिरेक टाळून भावनांचा थेट आविष्कार साधला आहे. त्यामुळे या कविता सामान्य वाचकांपर्यंत सहज पोहोचतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात.

मान्यवरांचे योगदान

या पुस्तकाला अनेक दिग्गज मान्यवरांचे शुभेच्छा संदेश लाभले आहेत. त्यामुळे या काव्यसंग्रहाला चार चांद लागले आहे. म्हणूनच या साहित्यकृतीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.

विशेषत प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक पंजाबराव चव्हाण साहेब यांची प्रस्तावना हा या संग्रहाचा आत्मा आहे. ती केवळ परिचय नसून कवितांचे सखोल साहित्यिक विश्लेषण करणारी मार्गदर्शक भूमिका बजावते.

साहित्यिक मूल्य

‘वसंत गीतांजली’ हा संग्रह केवळ व्यक्तिस्तुती करत नाही, तर—

मूल्यांची मांडणी करते
नेतृत्वाची व्याख्या स्पष्ट करते
ग्रामीण वास्तव अधोरेखित करतेआणि समाजाला विचार करायला भाग पाडते

अशा प्रकारे हा संग्रह साहित्य आणि समाज यांना जोडणारा दुवा ठरतो.


निष्कर्ष

एकूणच ‘वसंत गीतांजली’ हा काव्यसंग्रह म्हणजे लोकनेते वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याला वाहिलेली काव्यात्मक श्रद्धांजली आहे. स्वर्गीय सुधाकर पवार यांच्या अपूर्ण राहिलेल्या साहित्यिक स्वप्नांची पूर्तता आणि सुरज पवार यांच्या प्रयत्नांतून जपलेला हा वारसा म्हणजे एक सांस्कृतिक दस्तऐवज आहे.
इतिहास, प्रेरणा, साहित्य, राष्ट्रभावना आणि मानवी मूल्यांचा असा दुर्मिळ संगम या संग्रहात दिसतो.

ही केवळ कविता नाही—हा एका विचाराचा प्रवास आहे, एका युगाचा दस्तऐवज आहे आणि एका स्वप्नाच्या पूर्णत्वाचा काव्यमय उत्सव आहे.
जो येणाऱ्या नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल तरुण पिढीला नवी दिशा आणि प्रेरणा देईल. सुरज पवार संपादित
वसंत गीतांजली या काव्यसंग्रहाला माझ्या खूप खूप शुभेच्छा...


"वसंत गीतांजली "
प्रकाशक - वारकरी प्रकाशन मुंबई
कवी - स्व. सुधाकर पवार
संपादक - सुरज पवार 
समीक्षक- मनिषा कांबळे यवतमाळ 
मूल्य - 175

✍️ मनिषा आनंदराव कांबळे यवतमाळ

Post a Comment

Previous Post Next Post