Top News

क्रांतिकारकांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य जपणे हीच खरी राष्ट्रसेवा.


प. पू.आचार्य श्री अमोघकीर्तीजी महाराज.

 राष्ट्रप्रेम, संस्कार आणि इतिहासाची जपणूक यांचा संदेश देणारी एक प्रेरणादायी भेट धरणगाव येथे पार पडली . धर्मदिवाकर परमपूज्य १०८ आचार्य श्री अमोघकीर्तीजी महाराज व परमपूज्य आचार्य श्री अमरकीर्तीजी महाराज यांनी धरणगाव येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकास सदिच्छा भेट देऊन स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाला अभिवादन केले. 

यावेळी स्मारक परिसरात उपस्थितांशी संवाद साधताना आचार्यश्रींनी सांगितले की, “आज आपण ज्या स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, ते स्वातंत्र्य असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षामुळे प्राप्त झाले आहे. राष्ट्र प्रथम ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये दृढ असली पाहिजे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचे जतन करणे ही काळाची गरज आहे.”
स्मारकास भेटीदरम्यान आचार्यश्रींनी क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या कार्याचा तसेच जनजाती समाजातील विविध स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचा सविस्तर आढावा घेतला. या महान क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेला लढा आणि राष्ट्रनिष्ठेची परंपरा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेच्या सामाजिक, ऐतिहासिक व जनजागृतीपर कार्याचे कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभ आशीर्वाद दिले.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह मा. श्री बाळासाहेबजी चौधरी, क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेचे सचिव श्री विलास महाजन सर सहसचिव श्री समाधान मोरे,पालक श्री किशोर चौधरी सर व सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते, डॉ हेडगेवार नगर ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य उपस्थित होते.
तसेच श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुलभाऊ जैन, पंचमंडळाचे सदस्य, मुनीश्रींचे वडील प्रा. ए. एम. जैन सर, आई सौ. कणकमाला जैन, जैन समाजातील मान्यवर, समाजबांधव,श्रावक-श्राविका तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आचार्यश्रींच्या आगमनामुळे स्मारक परिसरात भक्तिमय व राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post