Top News

📰 धरणगाव नगरीत हरिनामाचा महासागर; भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिर व अधिकमास निमित्त कीर्तन महोत्सव अभूतपूर्व उत्साहात संपन्न..!


धरणगाव येथील नवेगाव, तेली तलाव, श्री मारोती मंदिर परिसरात श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव यांच्या वतीने आयोजित भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिर व अधिकमास निमित्त आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाममय कीर्तन महोत्सव गुरुवार दि. २८ मे २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय, मंगलमय, दैदिप्यमान आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आठ दिवस चाललेल्या या भव्य आध्यात्मिक सोहळ्याने धरणगाव नगरीत भक्ती, संस्कार, राष्ट्रप्रेम आणि धर्मजागृतीचा अद्वितीय जागर घडवून आणला.
दि. २१ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत संपूर्ण परिसर “राम कृष्ण हरी”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या अखंड हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. पहाटेच्या प्रभातफेरी, काकडा आरती, हरिपाठ, भजन, प्रवचन, हरिकीर्तन आणि संतवाणीच्या माध्यमातून वारकरी परंपरेचे संस्कारमूल्य समाजमनात रुजविण्याचे महान कार्य या महोत्सवातून घडले.

या दिव्य कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, भागवताचार्य, प्रवचनकार व संतविचारवंतांनी आपल्या ओजस्वी वाणीने हजारो भाविकांना भक्ती, ज्ञान, वैराग्य, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कारांचे अमूल्य धडे दिले.

✨ कीर्तन सेवेत सहभागी झालेल्या मान्यवर महाराजांची थोर सेवा :
🔸 दि. २१ मे २०२६ – गुरुवार भागवताचार्य ह.भ.प. श्री भावेश महाराज विटनेरकर यांनी श्रीमद्भागवत धर्म, संत विचार आणि भक्तिमार्गाचे सखोल निरूपण करून भाविकांना अध्यात्माचा अमृतरस दिला.
🔸 दि. २२ मे २०२६ – शुक्रवार गायनगंधर्व ह.भ.प. श्री लिलाधर महाराज ओझरकर यांच्या मधुर व सुरेल हरिकीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
🔸 दि. २३ मे २०२६ – शनिवार ज्ञानसिंधू ह.भ.प. श्री ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर यांनी संत परंपरा, समाजप्रबोधन आणि संस्कारांचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले.
🔸 दि. २४ मे २०२६ – रविवार कीर्तन केसरी ह.भ.प. श्री मनोज महाराज एनगावकर यांच्या ओजस्वी आणि जोशपूर्ण कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
🔸 दि. २५ मे २०२६ – सोमवार संभाजीराजे चरित्र व्याख्याते परमेश्वर महाराज पाळधीकर यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाचा गौरवशाली इतिहास जाज्वल्य शब्दांत उलगडून सांगितला.
🔸 दि. २६ मे २०२६ – मंगळवार ह.भ.प. श्री गजानन महाराज वरसाडेकर यांनी गोपीगीताच्या माध्यमातून श्रीकृष्ण भक्तीचा अमृतमय वर्षाव करीत भाविकांना भक्तीभावात तल्लीन केले.
🔸 दि. २७ मे २०२६ – बुधवार भागवताचार्य ह.भ.प. श्री अतुल महाराज नारणेकर यांनी भागवत धर्म, संत साहित्य आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले.
🔸 दि. २८ मे २०२६ – गुरुवार महंत गायनगंधर्व ह.भ.प. श्री अनिल महाराज धरणगावकर यांच्या भव्य, ओजस्वी आणि भक्तिरसपूर्ण हरिकीर्तनाने सप्ताहाची मंगलमय सांगता झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या अखंड घोषात संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला.

या सप्ताहादरम्यान लहान बालकांपासून ज्येष्ठ वारकऱ्यांपर्यंत सर्व स्तरातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वारकरी परंपरेचे संस्कार, संतांचे विचार, राष्ट्रभक्ती, धर्मजागृती आणि समाजप्रबोधन यांचा अद्वितीय संगम या महोत्सवातून अनुभवायला मिळाला.

 या भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचे यशस्वी आयोजन श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव यांनी अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भक्तिमय वातावरणात केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समस्त माळी समाज पंच मंडळ, पाटील समाज पंच मंडळ, मराठे समाज पंच मंडळ, तिळवण तेली समाज पंच मंडळ, लहान माळीवाडा, नवेगाव परिसरातील नागरिक तसेच सर्व समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.

विशेष म्हणजे संस्थेमध्ये अनेक गोरगरीब, गरजू व अनाथ विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेत असून त्यांचे संगोपन, शिक्षण व संस्कारांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. ज्या भाविकांना आपल्या वाढदिवसानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त किंवा इतर धार्मिक प्रसंगी अन्नदान, वस्त्रदान, शालेय साहित्यदान अथवा अन्य प्रकारची सेवा करावयाची असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” या संतवचनांचा प्रत्यय देणारा हा भव्य कीर्तन महोत्सव धरणगावच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णमयी पर्व ठरला असून हरिनाम, भक्ती, संस्कार आणि राष्ट्रचेतनेचा दीप पुढील पिढ्यांच्या मनामनांत प्रज्वलित करणारा प्रेरणादायी सोहळा म्हणून कायम स्मरणात राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post