अमळनेर (प्रतिनिधी – किरण माळी):
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रऊफ बँड पथकाचा मालक असलम अली (वय २९, रा. सराफ बाजार, अमळनेर) याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना निवेदन देऊन तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात, गुन्ह्यात वापरलेली रऊफ बँड पथकाची गाडी वाहतूक व परिवहन नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्याने, ती ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, असलम अली व त्याच्या सहकाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन त्यांच्या कॉल डिटेल्सची (सीडीआर) सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद आहे.
या निवेदनावेळी जिजाबराव पाटील (भाजप जानवे मंडळ अध्यक्ष), योगेश गोविंदा महाजन (शहर अध्यक्ष, भाजप अमळनेर), राहुल किशोर पाटील (पातोंडा मंडळ अध्यक्ष), माजी नगरसेवक श्याम पाटील, देविदास लांडगे (भाजप युवा मोर्चा), समाधान नाना पाटील (युवा मोर्चा सरचिटणीस), रवींद्र ठाकूर (वाहतूक आघाडी), विक्रांत भास्करराव पाटील (माजी नगरसेवक), शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पाटील, नगरसेवक संजय पाटील आदींसह अनेक पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या घटनेने अमळनेर व परिसरात खळबळ उडाली असून, संबंधितांवर कायदेशीर आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
Post a Comment