धरणगाव (प्रतिनिधी) – पश्चिम रेल्वेच्या धरणगाव रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या विविध सोयीसुविधा व समस्यांच्या अनुषंगाने खान्देश प्रवासी असोसिएशनच्या वतीने स्थानक व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. याचबरोबर डी.आर.एम. (पश्चिम रेल्वे, भुसावळ) व जी.एम. (पश्चिम रेल्वे, मुंबई) यांनाही निवेदन पत्राद्वारे पाठवण्यात आले आहे.
निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:
- प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वर प्रवाशांसाठी मुबलक थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
- प्लॅटफॉर्म व टॉयलेट-बाथरूमची वेळोवेळी स्वच्छता होण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.
- तिकीट बुकिंगसाठी कर्मचारी संख्या अपुरी असून, ती वाढवण्यात यावी.
- धरणगाव स्थानकावर नवीन ओव्हरब्रिज उभारण्यात यावा.
- प्लॅटफॉर्म क्रमांक 2 गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने 4 नवीन लाईट पोल बसवण्यात यावेत.
- अनाउन्समेंट सिस्टीम व कोच इंडिकेटर सुविधा सुरू करावी, जेणेकरून प्रवाशांना गाड्यांबाबतची अचूक माहिती मिळेल.
- स्थानकावर आरपीएफची आऊट पोस्ट स्थापन करण्यात यावी.
- अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये नियोजित सोयी सुविधा वेळेत व दर्जेदाररित्या पूर्ण करण्यात याव्यात.
- दोन्ही प्लॅटफॉर्मजवळील मोकळ्या जागेत गार्डन विकसित करण्यात यावं.
- नवीन सुरू झालेल्या गाड्यांच्या वेळापत्रकाचे अद्ययावत बोर्ड स्थानकावर लावण्यात यावेत.
या निवेदनप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. पुनीलालआप्पा महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजयभाऊ महाजन, सभापती जिजाबराव पाटील, तालुकाध्यक्ष दिनेशभाऊ पाटील, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंदनदादा पाटील, शहराध्यक्ष दिलीपभाऊ महाजन, मधुकरजी महाजन, गोपालभाऊ पाटील, मीडियाप्रमुख टोनीभाऊ महाजन यांची उपस्थिती होती.
खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ऍड. नंदन पाटील, खजिनदार प्रतिक जैन यांच्यासह सदस्य दिनेश पाटील, प्रशांत दुतीया, युवराज रायपूरकर, जतीन नगरिया, संभाजी सोनवणे, नारायण महाजन यांनीही सहभाग घेतला.
या निवेदनाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
Post a Comment