धरणगांव – तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या कामांसाठी मंजूर बिले काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला अँन्टी करप्शन ब्युरो (ACB) जळगाव पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई 22 मार्च 2025 रोजी करण्यात आली. आरोपी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय 37), ग्रामविकास अधिकारी, खर्दे बुद्रुक, ता. धरणगाव, जि. जळगाव यांनी तक्रारदाराकडे 10 टक्के प्रमाणे 27,000 रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तडजोडीनंतर ही रक्कम 25,000 रुपयांवर आली.
बिल मंजुरीसाठी मागितली लाच
तक्रारदाराने त्यांच्या गावातील गटारी बांधकाम (2 लाख रुपये) आणि गावहाळ बांधकाम (70,000 रुपये) अशी एकूण 2,70,000 रुपयांची कामे केली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याने त्याची बिले मंजूर करून देण्याची विनंती ग्रामविकास अधिकाऱ्याकडे केली. या बदल्यात अधिकाऱ्याने मंजूर बिलाच्या 10 टक्के रकमेची लाच मागितली.
तक्रारदाराने ACB कडे तक्रार केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. तक्रारदाराने 22 मार्च रोजी आरोपीला 25,000 रुपये देताच, पथकाने अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
सदर आरोपीविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत ACB चे पोलीस निरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागरिकांनी लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार द्यावी – ACB
सरकारी कामांसाठी कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक:
टोल-फ्री: 1064
फोन नंबर: 0257-2235477
Post a Comment