Top News

मुसळी येथे शिवजन्मोत्सव निमित्त शिवव्याख्यान उत्साहात संपन्न.


छ. शिवरायांसारखा अद्वितीय राजा होणे नाही — व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्यातील चौथ्या दिवशी लक्ष्मणराव पाटील यांचे शिवव्याख्यान मोठ्या उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. विष्णू रामदास गुंजाळ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराने-धुळे), रावेर येथील कृषी अधिकारी एल. ए. पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख मोहन हरी पाटील आणि पत्रकार आबासाहेब वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजनाने झाली. प्रास्ताविक नितीन पाटील यांनी बहारदार शैलीत केले. मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर कृषी अधिकारी एल. ए. पाटील यांनी शिवरायांचे जल, जमीन, जंगल आणि जनतेबाबतचे बेजोड नियोजन उलगडले.

प्राचार्य डॉ. गुंजाळ यांनी शिवरायांचे तेजस्वी चरित्र व संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदर्शांचा संदर्भ देत, शिवरायांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या गरजेवर भर दिला.

मुख्य व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शिवरायांचे जीवन, राज्यकारभार, मॅनेजमेंट स्किल्स आणि प्रेरणादायी चरित्र विवेचित केले. "महाराजांसारखे दिसण्यापेक्षा त्यांचा एक तरी गुण अंगीकारला, तर आयुष्याचे सार्थक होईल," असे ते म्हणाले. त्यांनी शिवरायांच्या बालपणापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुसळीचे पोलीस पाटील नितीन पाटील यांनी केले. समारोप जिजाऊ वंदना आणि शिवप्रतिज्ञेने करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समिती व गावकऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.


Post a Comment

Previous Post Next Post